संशयितांची धरपकड; २५० जण ताब्यात   

श्रीनगर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत २५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
स्थानिकांच्या मदतीशिवाय इतका मोठा हल्ला होऊच शकत नाही, असा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे, दहशतवाद्यांना आश्रय, आर्थिक रसद किंवा अन्य कोणत्या प्रकारची मदत कोणी पुरवली का? याचा तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर तातडीने सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच, प्रत्येक वाहनांची आणि संशयितांची कसून चौकशी केली जात होती. यासोबतच, सुरक्षा दलाने ‘कोंबिग ऑपरेशन’देखील हाती घेतले होते. याअंतर्गत आतापर्यंत २५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सर्वत्र केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दहा लाखांची आर्थिक मदत

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत जम्मू आणि काश्मीर सरकारने जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना १ लाखांची मदत दिली जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी याबाबतची घोषणा केली.
 
पहलगाममधील हल्ल्याने मला धक्का बसला आहे. निष्पाप नागरिकांवरील या क्रूर आणि अर्थहीन कृत्याला आपल्या समाजात स्थान नाही. आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या. प्रियजनांच्या नुकसानाची भरपाई कोणत्याही पैशाने होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. या क्रूरतेमागील लोकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 

Related Articles